जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत माघारी प्रक्रियेचा शेवट झाल्यानंतर संपूर्ण राजकीय चित्र स्पष्ट झाले असून जिल्हाभरात ७०२ सदस्यपदाचे व ५४ नगराध्यक्षपदाचे अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे १८ नगरपालिकांमधील ४६४ सदस्यपदे आणि १८ नगराध्यक्षपदांसाठी एकूण १५५५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार असून प्रत्येक प्रभागात राजकीय तापमान चढू लागले आहे.
यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत २४६ प्रभागांतील ४६४ सदस्यपदे आणि १८ नगराध्यक्षपदांसाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी १७४ अर्ज वैध घोषित झाले होते, तर सदस्यपदासाठी तब्बल २८८१ अर्ज वैध ठरले होते. माघारीची अंतिम मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. काही प्रभागांमध्ये उमेदवारांमध्ये माघारीसंदर्भात निर्माण झालेल्या वादांमुळे न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याने काही निर्णय प्रलंबित राहिले आहेत. येत्या २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी एकूण १३९ अर्ज वैध होते. माघारीच्या पहिल्या दिवशी कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नव्हता. परंतु शेवटच्या दोन दिवसांत ५४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ७७ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी स्पर्धेत राहिले आहेत. भुसावळ आणि वरणगाव या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक ८-८ उमेदवार रिंगणात आहेत. तर जामनेरमध्ये साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
नगराध्यक्षपदाचे प्रभागनिहाय उमेदवार संख्या:
भुसावळ – ८, वरणगाव – ८, अमळनेर – ६, चाळीसगाव – ४, चोपडा – ४, पाचोरा – २, मुक्ताईनगर – २, यावल – ४, नशिराबाद – ६, पारोळा – ३, भडगाव – ३, धरणगाव – ३, सावदा – ४, रावेर – ६, एरंडोल – ४, फैजपूर – ४, शेंदुर्णी – ४.
दोंडाईच्यात ऐतिहासिक कामगिरी – शतप्रतिशत भाजप बिनविरोध
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपनं सर्व २६ नगरसेवकांना बिनविरोध विजयी करून ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या राजकीय विजयामुळे भाजपने दोंडाईचा पालिकेवर संपूर्ण वर्चस्व मिळवले आहे. नयनकुंवर रावल यांची तिसऱ्यांदा नगराध्यक्षा म्हणून निवड निश्चित झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, पिंपळनेर आणि शिंदखेडा येथे नगराध्यक्षपदाच्या ३ जागांसाठी १० तर नगरसेवक पदाच्या ६९ जागांसाठी २१३ उमेदवार रिंगणात आहेत.
धरणगावमध्ये सर्वाधिक माघारी
जळगाव जिल्ह्यातील १८ पालिकांमध्ये सर्वाधिक माघारी धरणगावमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे तब्बल ११६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर शेंदुर्णी आणि मुक्ताईनगरमध्ये सर्वांत कमी उमेदवारांनी माघार घेतली.



