लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ११ लोकांना जीव गमवावा लागल्यानंतर योगी आदित्यनाथ सरकार जागी झाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंसा घडवून आणणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून त्यांना नोटीसा पाठवायला सुरुवात केली आहे. तर ६०० समाजकंटकांना अटक करण्यात आली असून १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात १९ डिसेंबरपासून हिंसक आंदोलन सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून हिंसा घडविणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे लखनऊमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी पकडण्यात आलेल्या अर्धा डझन लोकांना पश्चिम बंगालमधून लखनऊमध्ये हिंसा घडवून आणण्यासाठी आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे सर्वजण पश्चिम बंगालच्या मालदा येथील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितले.