वसई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वसईच्या रानगाव येथील एचडी नावाच्या रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही मुलगी आपल्या आजीसह या रिसॉर्टमध्ये सहलीसाठी आली होती. रिसॉर्टच्या तरणतलावात बुडून चिमुकल्या मुलींचा मृत्यू होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे.
वसई पश्चिमेच्या रानगाव समुद्रकिनार्यावर एचडी नावाचे रिसॉर्ट आहे. समीक्षा जाधव ही चिमुकली आजीसह भांडुप येथे राहते. सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने ती आजीसह या रिसॉर्टमध्ये आली होती. त्यांच्यासोबत अन्य १४ महिला होत्या. सकाळी सर्वजण तरणतलावात उतरले होते. दुपारी १ च्या सुमारास सर्वजण जेवणासाठी बाहेर आले होते. तिची आजी आणि अन्य महिला जेवणाच्या रांगेत उभ्या होत्या. त्यावेळी समीक्षा नजर चुकवून पुन्हा तरणतलावात गेली. मात्र पाण्यात ती बुडू लागली. ती ओरडू लागल्यानंतर तिच्याकडे लक्ष गेले. तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तो पर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने ती बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले.या प्रकरणी वसई पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सगळे जण जेवणाच्या रांगेत होते. रिसॉर्टच्या तरणतलावाजवळ जीवरक्षक होते. पंरतु जेवणाची वेळ असल्याने ते जागेवर नव्हते. खेळता खेळता समीधा तरणतलावात गेली आणि ही दुर्घटना घडली, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले. समीधा ही आजीसोबत रहात होती. तिची आजी घरकाम करते. तिची आई तिला सोडून गेली असून वडील गावी राहतात. तिच्या या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.