भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यानंतर भुसावळातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे तर राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून भुसावळ शहर व तालुक्यासाठी ६८ कोटी २२ लाखांचा निधी मंजूर झाला. या निधीतून रस्ते, शासकीय इमारती, पुलांची कामे होणार असल्याची माहिती आ. संजय सावकारे यांनी दिली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून शहर व तालुक्यातील रस्ते व पुलाच्या कामांसाठी ५१ कोटी तर इमारतींसाठी १७ लाखाची कामे मंजूर झाली. शासकीय इमारतींमध्ये भुसावळ शहरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारतीच्या दुसर्या व तिसर्या मजल्यासाठी फर्निचर, भुसावळ तहसीलदार निवास बांधकाम व भुसावळ येथे प्रकार १ ची १६ व प्रकार २ ची ८ निवासस्थाने बांधणे, तालुक्यातून जाणारे रस्ते, नदी व नाल्यांवरील पुलासाठी निधी मंजूर झाला. यात शहरासाठी सर्वात महत्त्वाच्या यावल रोडच्या काँक्रिटीकरणासाठी १० कोटी रुपये मिळाले. गांधी पुतळा ते तापी पुलापर्यंत हे काम होईल. दरम्यान, अर्थसंकल्पीय निधीतून उपलब्ध होणार्या निधीतून दणळवणसेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल. शहरात सर्वाधिक कळीचा प्रश्न ठरलेल्या यावल रोडच्या काँक्रिटीकरणाचा प्रलंबित विषय निघेल. कारण, या रस्त्याच्या दुरुस्तीवर वारंवार मोठी निधी खर्च करावा लागतो.
यात राज्यमार्ग 6 ते जळगाव खुर्द, सुनसगाव, बेलव्हाय, वराडसीम, कुर्हे, खंडाळे, सुसरी, आचेगाव, पिंपळगाव, ओझरखेडा हा मार्ग नाबार्ड योजनेतून मंजूर झाला. किन्ही चोरवड, गोजोरा, भुसावळ ते जामनेर, हतनूर ते बोदवड वळण रस्त्यासह ओझरखेडा येथे पूल उभारणी, पिंपळगाव ते जुनोना रस्ता गावातील भागात काँक्रिटीकरण , अन्य ठिकाणी डांबरीकरण व गटारींचे बांधकाम होईल. अशी देखील माहिती आ. संजय सावकारे यांनी दिली.