नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसला उभारी द्यायची असेल तर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला पाहिजे असा पुनरुच्चार काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी केला आहे.
शशी थरुर यांनी यापूर्वीही अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याबाबत पुन्हा वक्तव्य केले होते. यावेळी ते म्हणाले, देशभरातील कार्यकर्ते आणि काही वरिष्ठ नेतेही तेच मत खाजगीत व्यक्त करत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी ही काँग्रेस कार्यकारिणीला विनंती आहे.’
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान कोण करणार याबाबतचंही उत्तर शशी थरुर यांनी दिलं. ‘काही जण म्हणतात कुणी आणि कशासाठी मतदान करावं. अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि पीसीसीच्या देशभरातील १० हजार सदस्यांमार्फत मतदान व्हावं हे मी आठ महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. समितीमधील निर्वाचित सदस्यांसाठी हा मतदानाचा अधिकार असावा’, असं शशी थरुर म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. नवीन अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.