मुंबई । संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता. या बैठकीस वन मंत्री संजय राठोड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव वने मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव पदुम अनुपकुमार आदींची उपस्थिती होती
सर्व प्रकारची बांधकामं, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील. त्याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशाप्रकारे विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ लावण्यात येऊन त्यानुसार ४५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.
राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसंच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.