गढवा (वृत्तसेवा) झारखंडच्या गढवा जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात झालेल्या बस अपघातात आत्तापर्यंत सहा जण ठार तर ३९ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस छत्तीसगडच्या अंबिकापूरहून गढवाकडे जात होती. दरम्यान, वाहन चालकाला डुलकी लागल्याने बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज पहाटे जवळपास २.०० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सर्व प्रवाशी जण गाढ झोपेत असताना अन्नराज घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानंतर रेलिंग तोडत ही बस दरीत कोसळली. या धोकादायक घाटात याआधीही असे अनेक अपघात झालेले आहे. अपघात होताच स्थानिक रहिवासी आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू केले आहे. घटनास्थळावर आणखीही काही लोक अडकलेल्या अवस्थेत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत सहा जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.