वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भारत गॅस कंपनीअंतर्गत कार्यरत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ७४ हजार १२४ रुपयांच्या भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २६) सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोडाऊनचे कडी-कोंडे तोडून ५८ भरलेले सिलेंडर लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर-वरणगाव महामार्गावरील लाल माती शिवारात हे गोडाऊन असून ते भारत गॅस कंपनीअंतर्गत रोहन गॅस एजन्सीचे आहे. एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (रा. भुसावळ) यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रति सिलेंडर १,२७८ रुपये किंमतीचे एकूण ५८ भरलेले सिलेंडर चोरीस गेले असून एकूण नुकसान ७४,१२४ रुपये इतके आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा तसेच गोडाऊनवर कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत डल्ला मारला. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी चौकीदार नसल्याचेही समोर आले आहे. अतिरिक्त साठा म्हणून ठेवण्यात आलेले भरलेले सिलेंडरच लक्ष्य करत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता गोडाऊन किपर शंकर किसन सुरवाडे (रा. सिद्धेश्वरनगर, वरणगाव) आणि कर्मचारी अभिलाष बावस्कर हे सिलेंडर घेण्यासाठी गोडाऊनवर गेले असता कुलूप तुटलेले दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सिलेंडर चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ एजन्सीचे संचालक नरेंद्र अहिरे यांना माहिती दिली. त्यानंतर वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून औद्योगिक व व्यापारी आस्थापनांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. परिसरातील हालचाली, वाहनांची माहिती आणि इतर तांत्रिक बाबींची छाननी केली जात आहे.



