बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १३ प्रभागांमध्ये ५३ उमेदवार रिंगणात उरले असून आता येथील रणधुमाळीस खर्या अर्थाने वेग येणार आहे.
बोदवड नगरपंचायतीची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होत असून यासाठी काल म्हणजेच १३ डिसेंबर रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. यात ७४ पैकी २१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून ओबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे चार प्रभागांची निवडणूक स्थगित झाल्याने आता उर्वरित १३ प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे. १३ प्रभागांसाठी ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक १८ अपक्ष तर तीन भाजपचे उमेदवार आहेत.
अर्ज माघारी घेणार्या उमेदवारांची माहिती प्रशासनाने दिली आहे. यात प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन अपक्ष उमेदवारांची माघार, प्रभाग क्रमांक पाचमध्ये तीन अपक्ष उमेदवारांची माघार, प्रभाग क्रमांक सहामध्ये एक अपक्ष उमेदवाराची माघार, प्रभाग क्रमांक आठमध्ये एक अपक्ष उमेदवारांची माघार, प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजप व अपक्ष अशा दोन उमेदवारांची माघार, प्रभाग क्रमांक १० मध्ये एक अपक्ष उमेदवाराची माघार, प्रभाग क्रमांक ११ मध्ये दोन अपक्ष उमेदवारांची माघार, प्रभाग क्रमांक १२ मध्ये तीन अपक्ष व एक भाजप अशा चार उमेदवारांची माघार, प्रभाग क्रमांक १३ मध्ये अपक्ष उमेदवाराची माघार आणि प्रभाग क्रमांक १६ मध्ये एक भाजप उमेदवाराने माघार घेतली, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार प्रथमेश घोलप, मुख्याधिकारी आकाश डोईफोडे व कर्मचार्यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या उमेदवारांना आज निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तर, आता लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे येथील रणधुमाळीला खर्या अर्थाने वेग येणार आहे.