पालघर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सुमारे १० आश्रमशाळांमधील ५० विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. अन्नातून विषबाधा कशामुळे झाली? यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. या आश्रमशाळांना अन्नपुरवठा करणाऱ्यांचीच चौकशी केली जात आहे. तसेच अन्नाचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले
पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू प्रकल्पांतर्गत विविध आश्रमशाळांमधील ५० हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि चक्कर यांसारखा त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले. अन्नातून विषबाधा कशामुळे झाली? याचा तपास केला जात आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
डहाणूतील रांकोळ येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर काही तासांतच उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि तापाचा त्रास जाणवू लागला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी पडल्याने त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डहाणूतील आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सत्यम गांधी यांनी पीटीआयला सांगितले की, पालघरमधील मध्यवर्ती स्वयंपाकघरातून या आश्रमशाळांना अन्नपुरवठा केला जातो आणि या घटनेनंतर अन्नाचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह आरोग्य विभाग व इतर अधिकारी डहाणू व तलासरी तालुक्यातील ज्या रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहेत, त्या रुग्णालयांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यर्थ्यांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.