Home आरोग्य ५० रुग्णांनी घेतला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ ; आ. अमोल जावळे यांचा...

५० रुग्णांनी घेतला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ ; आ. अमोल जावळे यांचा पुढाकार


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने रावेर तालुक्यातील ५० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरातून निवड झालेल्या रुग्णांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार देण्यात आले.

रावेर येथे आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबिरात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी मोतीबिंदूची समस्या असलेल्या ५० रुग्णांची निवड करून त्यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी जळगाव जीएमसी येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या जड जाते, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.

विशेष म्हणजे या सर्व रुग्णांची जळगाव येथे ने-आण, प्रवास खर्च तसेच इतर अनुषंगिक खर्च आमदार अमोल जावळे यांनी स्वखर्चाने उचलला. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे अनेक वृद्धांना पुन्हा दृष्टी लाभली असून त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

या शस्त्रक्रिया मोहिमेत डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शोभा घोणशीकर, डॉ. मयुरी राठोड, डॉ. मयुरेश डोंगरे, डॉ. स्वाती असोले, डॉ. सोफिया अन्सारी, डॉ. अनंत लांडगे, डॉ. तुषार जोशी आणि डॉ. कल्पेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच वृंदा कुंभारे, सुनीता वक्ते, डॉ. भाग्यश्री ढाकणे, डॉ. हिरा पालवे, डॉ. मयुरी हिवर्दे, डॉ. वैष्णवी दांडगे, उमेश वेल्हाळ आणि स्वप्नील पाटील या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून रुग्णसेवेत योगदान दिले.

संपूर्ण शिबिराचे नियोजन गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील यांनी केले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी वैद्यकीय पथकाला मार्गदर्शन केले. शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज पाटील तसेच संदीप महाजन, बाळा आमोदकर, कुणाल सोनवणे आणि चेतन भिरुड यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound