मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार आता महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार असून याचा शासन निर्णय म्हणजेच जीआर जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांना एसटी महामंडळाच्या प्रवासात ५० टक्के सवलत मिळेल असे जाहीर केले होते. या योजनेला महिला सन्मान योजना असे नाव देण्यात आले होते. अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर ही योजना प्रत्यक्षात केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या अनुषंगाने राज्य सरकारने जीआर काढून काल मध्यरात्रीपासून ही योजना लागू केली आहे. अर्थात, आज सकाळपासून महिलांना एसटी बसच्या तिकिटात निम्मे तिकिट लागणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. तर, यामुळे मात्र एस.टी. महामंडळाला आर्थिक फटका बसणार आहे. याची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे. आधीच राज्य सरकारने ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या नागरिकांना ५० टक्के सवलत प्रदान केलेली आहे.