ज्या बहिणीचे फॉर्म रखडले त्यांना तीन महिन्याचे ४५०० मिळतील – फडणवीस

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत. ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकदम देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथे होत आहे. सुरुवात पुण्यापासून का? असे मला विचारले एकाने विचारले होते. ज्यावेळेस परकियांचे आक्रमण आमच्यावर झाले त्यावेळेस आई जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांगितले की. महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे ठिकाण आहे असे त्यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, आपले सरकार देना बँक सरकार आहे. याआधीच सरकार लेना बँक सरकार होते. मागच्या काळातील सरकार वसुली करणारे सरकार होतं. आत्ताचे सरकार बहिणींना देणारे सरकार आहे. त्यामुळे आज आपण ठरवले पुण्यापासून सुरुवात करायची. पण पुण्यापासून जरी औपचारिक सुरुवात केली असली तरी मुख्यमंर्त्यांनी सांगितले पैसे क्रेडिट करणे सुरू करा. आता एक कोटी तीन लाख महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत. आता थोड्या महिला बाकी आहेत. पण काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

३१ जुलैपर्यंतचे फॉर्मचे पैसे जमा केले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंतच्या फॉर्मचे पैसे जमा होताना महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत. सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही सगळे पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Protected Content