Home Cities जळगाव अयोध्याहून परतणारे ४३ भाविक जळगावात सुखरूप ; भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त

अयोध्याहून परतणारे ४३ भाविक जळगावात सुखरूप ; भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अयोध्या–प्रयागराज महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जखमी झालेल्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील भाविकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. स्वतंत्र रिझर्वेशन बोगीची व्यवस्था करून सर्व भाविकांना सुरक्षित परतीचा मार्ग उपलब्ध करून दिल्यानंतर ते आज लखनऊ ते एलटीटी गाडी क्रमांक 01016 द्वारे जळगावात सुखरूप दाखल झाले. जळगाव स्टेशनवर उतरताच भाविकांनी प्रशासनाच्या वेगवान व संवेदनशील प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अपघातानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन, सुलतानपूर प्रशासन, लखनऊ व भुसावळ रेल्वे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एकत्रितपणे निवास, भोजन, उपचार आणि परतीची व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे केली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी हे संपूर्ण ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले.

या अपघातात पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई शरद पाटील (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहाची ॲम्बुलन्सद्वारे तत्काळ जळगावात वाहतूक करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मृतकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.

परत आलेल्या ४३ भाविकांमध्ये दोन धुळे, एक नाशिक, एक पुणे येथील तर उर्वरित जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भुसावळ, यावल, पारोळा आणि वरणगाव परिसरातील आहेत. दीर्घ प्रवासानंतर जळगाव स्टेशनवर पोहोचताच निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी त्यांच्या स्वागतासाठी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक भाविकाची चौकशी केली.

यावेळी तहसीलदार धरणगाव महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, रेल्वे अधिकारी तसेच भाविकांचे नातेवाईक उपस्थित होते. भाविकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने वाहतूक सुलभतेचीही विशेष काळजी घेतली असून प्रत्येकाशी सतत संपर्क ठेवला जात आहे.

सायंकाळी साडेसहा वाजता सर्व भाविक जळगावात सुखरूप दाखल झाले आणि नातेवाईकांच्या सोबत निवासस्थानाकडे रवाना झाले. प्रशासनाने केलेल्या तातडीच्या आणि संवेदनशील मदतकार्यास सर्वांनी मनापासून धन्यवाद दिले.


Protected Content

Play sound