नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात किमान 10 भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यापैकी 5 जण केरळचे रहिवासी होते. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कुवेतच्या वेळेनुसार सकाळी 6 वाजता हा अपघात झाला.
पहाटे लागलेली आग संपूर्ण इमारतीत पसरली. अनेक लोक इमारतीत अडकले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मेजर जनरल ईद रशीद हमद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, या इमारतीत अनेक स्थलांतरित मजूर राहतात.
कुवेतमधील घटनेबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्यही समोर आले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ते म्हणाले की, “कुवेतमध्ये झालेल्या अपघातामुळे मला धक्का बसला आहे. तेथे सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही तपशील बाहेर येण्याची वाट पाहत आहोत. भारतीय राजदूत घटनास्थळी रवाना झाले आहेत. ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो.”