यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील न्यायालय परिसरात नुकतीच पार पडलेली राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी ठरली असून, महसूल प्रशासन आणि यावल वकील संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ३५० प्रकरणांचे निपटारा करण्यात आला. विशेष म्हणजे या लोकअदालतीत ४ लाखांहून अधिक रकमेचा महसूल देखील वसूल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत जमीन महसूल आणि थकबाकी वसुली संदर्भातील प्रकरणे निकाली लावण्यासाठी मंडळनिहाय नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रभारी उपविभागीय अधिकारी (फैजपूर) निवृत्ती गायकवाड, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, नायब तहसीलदार बी.एम. पवार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकअदालतीत थकबाकीदार नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रलंबित प्रकरणे सहज मार्गी लागली. स्थानिक महसूल वकील संघानेही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. यावल तालुका विधी सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. गोविंद बारी, ॲड. नितीन चौधरी, अॅड. अशोक सुरडकर, ॲड. रियाज पटेल यांच्यासह अनेक वकिलांनी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधत काम केले.
या लोकअदालतीत एकूण ३५० प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. त्यातून ४ लाख रुपयांहून अधिक रकमेचा महसूल जमा करण्यात प्रशासनाला यश आले. महसूल वसुलीतील हा उपक्रम प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरला आहे.



