Home Cities चोपडा १०८ देशांतील प्रार्थनेत चोपड्याचा सहभाग; ‘णमो अरिहंताणं’ने भरला परिसर भक्तिमय

१०८ देशांतील प्रार्थनेत चोपड्याचा सहभाग; ‘णमो अरिहंताणं’ने भरला परिसर भक्तिमय


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगामध्ये वाढती अशांतता, युद्धाची टांगती तलवार आणि मानवी जीवनातील तणाव दूर करण्यासाठी विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या ‘णमो अरिहंताणं’ या नवकार महामंत्राचा सामूहिक जप आज चोपडा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ज्यांनी पूर्ण ज्ञान प्राप्त केले आहे, जे तीर्थ स्थापन करतात आणि जे आध्यात्मिक मार्ग दाखवतात, अशा सर्व अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधूंना नमन करत विश्व कल्याणाची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नवकार मंत्र हा केवळ विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नसून तो सद्गुणांची उपासना करणारा मंत्र असल्याने, या जपाने मनःशांती मिळते आणि आध्यात्मिक विकास होतो, या श्रद्धेने शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.
विश्व शांती नवकार महामंत्र दिनानिमित्त ९ एप्रिल, गुरुवार रोजी एका विशेष जागतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक ८ वाजता जगभरातील १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० केंद्रांवर एकाच वेळी हा सामूहिक प्रार्थना सोहळा पार पडला. चोपडा शहरात मेनरोडवरील डॉ. निर्मल टाटीया यांच्या निवासस्थानी या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना आणि सर्वसामान्य माणूस विविध विवंचनांनी ग्रासलेला असताना, अशा सामूहिक प्रार्थनेतून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा एका सुदृढ आणि शांत समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा सूर यावेळी उमटला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मंगल कलशपूजनाने करण्यात आली. या प्रसंगी तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी आमदार कैलास पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब घोलप, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी आणि चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यजमान डॉ. निर्मल टाटीया यांच्यासह सकल जैन समाजाचे पदाधिकारी रमेश माणकलाल जैन, विनोदकुमार बिलाकचंद टाटीया, मोहनलाल गिरधारीलाल जैन, राजेंद्र रमणलाल जैन, सुभाषचंद किसनलाल बरडीया, अनिलकुमार सुनीलकुमार बुरड, संजय गोकुळदास श्रावगी आणि तिलकभाई शाह यांनी विधीवत पूजन केले.

कलशपूजनानंतर उपस्थित सर्व स्त्री-पुरुषांनी एकाग्र चित्ताने नवकार महामंत्राचे सामुदायिक पठण केले. ‘णमो अरिहंताणं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. “हा मंत्र सर्व पापांचा नाश करणारा असून मांगल्याची प्राप्ती करून देणारा आहे,” अशी पवित्र भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी एकत्र येत विश्वशांतीसाठी केलेली ही प्रार्थना चोपडा शहराच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारी ठरली.

चोपडा येथे जागतिक नवकार महामंत्र दिनानिमित्त भव्य सामूहिक प्रार्थना सोहळा पार पडला. १०८ देशांमध्ये एकाच वेळी झालेल्या या उपक्रमात चोपड्यातील मान्यवर आणि नागरिकांनी सहभागी होत विश्वशांती व मानवी कल्याणासाठी मंत्रोच्चार केला.


Protected Content

Play sound