जळगाव, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वाची बैठक सोमवार, १३ एप्रिल रोजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहराच्या स्वच्छतेपासून ते आरोग्य सुविधांपर्यंत आणि रस्ते बांधकामापासून ते वाहनांच्या इंधन खरेदीर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रशासकीय प्रस्तावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर १७ विषय असणार आहेत.
महानगरपालिकेच्या विविध विभागांतील वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदीचे प्रस्ताव बैठकीत मांडले जाणार आहेत. यामध्ये: डिझेल खरेदी: सुमारे १२,००० लिटर डिझेलच्या विविध टप्प्यांवरील खरेदीसाठी प्रत्येकी ११.०४ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली जाणार आहे. पेट्रोल खरेदी: प्रशासकीय वाहनांसाठी ६,००० लिटर पेट्रोलसाठी ६.३३ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव आहे. वाहन दुरुस्ती: अग्निशमन दलाचे ‘देवदूत’ वाहन, रोड स्विपर मशिन, फॉगर मशिन आणि विद्युत विभागाची हायड्रोलिक शिडी यांच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. शहरातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने १३ नवीन ‘पोर्टा केबिन’ (Porta Cabin) UHWC केंद्रे खरेदी करण्याचा मोठा प्रस्ताव आहे. यासाठी २.५८ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी मानसेवी कामगारांची नियुक्ती आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार कायदा २०२३ नुसार, सन २०२५-२६ पासून शहरातील मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कराची आकारणी बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे. यासह इतर वर स्थायी समिती काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




