धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका वासनांध शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावून गेल्या तीन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
अशी आहे सविस्तर घटना :
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अहिरे असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी नववीत असताना या शिक्षकाने तिच्याशी गोड बोलून मैत्री केली. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण, तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तिच्यासोबतकाही आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती घालून तो २०२२ पासून तर सप्टेंबर २०२५ पर्यंत वारंवार तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी करत अत्याचार करत होता.

त्रास असह्य झाल्याने दिला चोप :
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला हा शारीरिक आणि मानसिक छळ आता पीडितेसाठी असह्य झाला होता. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर धाडस करून आपल्या कुटुंबीयांना ही आपबिती सांगितली. हे ऐकून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि विद्यार्थिनीने धरणगावमध्ये या शिक्षकाला गाठले आणि काठ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नराधम शिक्षकाला अटक :
याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक राहुल अहिरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. क्षेत्रातील शैक्षणिक वर्तुळात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, अशा नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



