Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण स्तरावर प्रशासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस पाटलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज एका विशेष एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत प्रचंड प्रतिसाद दिला. जिल्हादंडाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात पोलिस पाटलांची भूमिका अत्यंत कळीची असते. कार्यशाळेच्या सत्रांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी पोलिस पाटलांना मार्गदर्शन केले.

फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील बारकावे समजावून सांगितले, तर जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिस प्रशासनाला तांत्रिक व प्रत्यक्ष स्वरूपात कशा प्रकारे सहकार्य करावे, यावर प्रकाश टाकला. आगामी काळातील आव्हाने लक्षात घेता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविर रावळ यांनी नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या काळात पोलिस पाटलांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.

निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्यांबाबत निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी मार्गदर्शन केले, तर सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामातील पोलिस पाटलांचे महत्त्व सहायक महसूल अधिकारी अतुल जोशी यांनी अधोरेखित केले. ही कार्यशाळा जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound