
वैजापूर तालुका यावल प्रतिनिधी :रावेर आणि फैजपूर येथे रामनवमी निमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात काही वक्त्यांनी कथितरीत्या दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भाषणे केल्याचा प्रकार समोर आला. या भाषणामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘जळगाव जिल्हा एकता संघटना’ आणि ‘कौमी एकता फाउंडेशन’च्या वतीने पोलीस प्रशासनाकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामनवमीच्या कार्यक्रमात काही वक्त्यांनी विशिष्ट समाजाविरुद्ध आक्षेपार्ह आणि द्वेषयुक्त वक्तव्ये केली आहेत. या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, यामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या भाषणांमुळे समाजात वैमनस्य निर्माण होत असून कायद्याचे उल्लंघन झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
पोलीस प्रशासनाकडे कठोर मागणी :
या संदर्भात रावेर व फैजपूर पोलीस स्टेशनसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. तक्रारीत भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांचा संदर्भ देत दोषींवर तातडीने गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा दाखला देत, अशा द्वेषयुक्त भाषणांच्या (Hate Speech) प्रकरणांमध्ये पोलिसांनी कोणाच्याही तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यांची होती उपस्थिती :
तक्रारदारांनी मागणी केली आहे की, व्हायरल व्हिडिओची तांत्रिक तपासणी करून सत्यता पडताळली जावी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हे निवेदन देतेवेळी फारुख शेख (जळगाव), शेख कुरबान (फैजपूर), कलीम मेम्बर, रियाज मेम्बर, शेख फारुख अब्दुला, वसीम, अब्दुल रज्जाक भाई, अवेस भांजा, असीफ (मेकॅनिकल), अख्तर पहेलवान, सुलतान (चायनीज), जफर अली, अमीन शेख, अनीस शाह, ताहेर शेख, ॲड. साब (रावेर) यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



