Home प्रशासन तहसील रावेर तालुक्यात निसर्गाचा कोप; वादळी पावसामुळे सुमारे ८ कोटींचे नुकसान, ३४ गावांना...

रावेर तालुक्यात निसर्गाचा कोप; वादळी पावसामुळे सुमारे ८ कोटींचे नुकसान, ३४ गावांना मोठा फटका


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गुरुवार, २ एप्रिल रोजी झालेल्या भीषण वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे रावेर तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे बळीराजा पुरता कोलमडला असून, प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यात सुमारे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण केले असून त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आला आहे.

३४ गावांना फटका; २५१ शेतकरी बाधित
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेल्या पंचनाम्यानुसार, रावेर तालुक्यातील तब्बल ३४ गावांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे. यात प्रामुख्याने केळी, मका आणि गहू या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून एकूण २५१ शेतकरी बाधित झाले आहेत. कृषी विभागाने हा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे.

पीकनिहाय नुकसानीचा तपशील:
नुकसानीच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक फटका केळीच्या बागांना बसला आहे. यात केळी: १९६.४५ हेक्टर क्षेत्र बाधित (२०१ शेतकरी), मका: २९.६२ हेक्टर क्षेत्र बाधित (४५ शेतकरी), गहू: २ हेक्टर क्षेत्र बाधित (५ शेतकरी)

नुकसानग्रस्त भागाची पाहणी
नुकसानीची तीव्रता पाहता प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार दिपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, राजन लासूरकर, तालुका अध्यक्ष सूर्यकांत देशमुख, माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्यासह धीरज धनके, राजू सवर्ण, लखन महाजन, योगेश महाजन, संजय महाजन, योगेश साळुंके, संदीप पाटील, जनार्दन पाटील, गणेश धनायते, पवन चौधरी आणि निलेश सावळे उपस्थित होते.

तातडीच्या मदतीची प्रतीक्षा
हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सुमारे ८ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने, शासनाने या पंचनाम्यांची दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.


Protected Content

Play sound