Home Cities यावल यावल तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; मका पिकांचे ८०% नुकसान

यावल तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; मका पिकांचे ८०% नुकसान


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात गुरुवार, २ एप्रिल रोजी रात्री झालेल्या वादळी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले असून, विशेषतः मका पिकावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. हाताशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले असून, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्यातील दहिगावसह परिसरात रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ८० टक्के मका पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने उभे केलेले पीक अक्षरशः जमिनीत पडले असून, उत्पादन पूर्णपणे कुचकामी ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांचे चार ते पाच एकर क्षेत्रातील मका पीक उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पिकासाठी केलेला खर्चही परत मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मका पिकाबरोबरच केळी, गहू आणि ऊस यांसारख्या पिकांनाही या वादळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे एकाच वेळी विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे.

आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस मोठा धक्का ठरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीची परिस्थिती बिकट होत चालली होती, मात्र २ एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती आणखी गंभीर केली आहे. सद्यस्थितीत नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत असून, तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound