यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विकासकामाचा ठेका घेतल्याच्या रागातून एका महिलेवर आणि साक्षीदारावर लोखंडी रॉड व खुर्पीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील अट्रावल येथे घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २८ मार्च रोजी रात्री ११ वाजता यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खूनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील अट्रावल गावात विजया तायडे वय ६० या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत वाड्यातील विकासकामाचा ठेका घेऊन काम पूर्ण केले होते. याचाच राग मनात धरून संशयित आरोपी बादल अनिल तायडे, नयना बादल तायडे, सागर अनिल तायडे, मायाबाई अनिल तायडे, प्रफुल्ल गोपीचंद निकुंभे, सुमित भालेराव आणि सागर तायडे सर्व रा. नावरे ता. यावल यांनी विजया तायडे यांच्याशी २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता वाद घातला.

संशयित आरोपींनी गावात बेकायदेशीर जमाव जमवून विजया तायडे आणि त्यांचे नातेवाईक आरती अरविंद भालेराव (वय ३६) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गाठले. यावेळी बादल अनिल तायडे याने हातातील लोखंडी रॉडने, तर अन्य एका आरोपीने लोखंडी खुर्पीच्या साह्याने फिर्यादी व साक्षीदारावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघींना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विजया तायडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी बादल अनिल तायडे, नयना बादल तायडे, सागर अनिल तायडे, मायाबाई अनिल तायडे, प्रफुल गोपीचंद निकुंभे, सुमित भालेराव आणि सागर तायडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे हे करीत आहे.



