जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात रविवारी, २९ मार्च रोजी महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मार्केट स्वच्छता अभियानाचा हा पुढील टप्पा असून यापूर्वीही महिनाभरापूर्वी अशी मोहीम राबविण्यात आली होती. काही गाळेधारकांच्या न्यायालयीन प्रकरणामुळे या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र नागरिकांच्या सातत्यपूर्ण महापारांकडे येणाऱ्या तक्रारीनंतर ही मोहीम हाती घेण्यात आली.
गोलाणी मार्केट हा शहरातील प्रमुख व्यापारी भाग असल्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा साचण्याची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महापौरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत झाडू हाती घेत परिसराची साफसफाई केली. या मोहिमेत स्थानिक नगरसेवक तथा माजी महापौर आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक तसेच स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महापौरांच्या सूचनेनुसार सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ४५३ बीव्हीजी कामगारांमार्फत विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. ५ ट्रॅक्टर, ३ पिकअप आणि १ डंपरच्या सहाय्याने तब्बल २२ टन कचरा संकलित करण्यात आला. मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मुकेश पाटील, स्वच्छता निरीक्षक समाधान निकम, मयूर सपकाळे, प्रदीप धापसे तसेच युनिट प्रमुख अजय चांगरे, उज्वल बेंडवाल, सतीश करोसीया, चेतन हातगाडे, सिद्धार्थ घेंगट, सूरज तांबोळी, विशाल वानखेडे, मंजू पवार आणि मालती रंधे यांच्यासह वार्ड मोकादम उपस्थित होते.
महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. कचरा ठराविक ठिकाणीच टाकावा, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छतेमुळे शहराचे आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहते, असेही त्यांनी नमूद केले.
या अभियानादरम्यान मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन, रस्त्यांची स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. व्यापाऱ्यांनाही त्यांच्या दुकानासमोरील परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेच्या वतीने अशा प्रकारच्या मोहिमा नियमित राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, महापौरांनी स्पष्ट केले की, मार्केट स्वच्छता अभियानाचा हा पुढील टप्पा असून यापूर्वीही महिनाभरापूर्वी अशी मोहीम राबविण्यात आली होती. काही गाळेधारकांच्या न्यायालयीन प्रकरणामुळे या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर ही मोहीम हाती घेण्यात आली.
या वेळी महापौरांनी दुकानदारांना कडक शब्दांत इशारा देत सांगितले की, महापालिका परिसर स्वच्छ करून देत आहे, मात्र पुढे स्वच्छता राखण्याची जबाबदारी दुकानदारांचीच असेल. दुकानाबाहेर कचरा साचू देऊ नये, कचराकुंडी ठेवावी आणि ग्राहकांनाही घाण न करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे त्यांनी बजावले. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्यास पुढील दोन दिवसांत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अभियानादरम्यान परिसरातील फळ विक्रेत्यांवर प्लास्टिक वापराबाबत महापौरांनी थेट कारवाई करण्यात केली. त्यांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आणि बायोडिग्रेडेबल किंवा कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी केले. तसेच खराब फळे आणि इतर कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या विक्रेत्यांना तो स्वतः उचलण्यास महापौरांनी भाग पाडलेण्



