Home आरोग्य कोरोना पुन्हा डोके वर काढतोय? 20 देशांत वाढले रुग्ण

कोरोना पुन्हा डोके वर काढतोय? 20 देशांत वाढले रुग्ण



नवी दिल्ली-वृत्तसेवा । कोरोनाच्या नवीन BA.3.2 व्हेरिएंटमुळे अमेरिकेसह जगभरातील २० हून अधिक देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात मात्र सध्या या व्हेरिएंटचा मोठा धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटची नोंद झाली होती. या व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटीनमध्ये सुमारे ७५ म्युटेशन आढळले आहेत. यामुळे हा व्हेरिएंट सतत आपलं स्वरूप बदलत असून, प्रतिकारशक्तीला चकवा देण्याची क्षमता त्याच्यात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याचा परिणाम इतर देशांमध्येही दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही भारतातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात अद्याप या व्हेरिएंटची कोणतीही नोंद झालेली नाही. देशातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याने गंभीर लक्षणे होण्याची शक्यता कमी आहे, असे साथींच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर यांनी सांगितले.

मास्क वापरण्याबाबत सध्या कोणतेही अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयांमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीत मास्क वापरणे फायदेशीर ठरू शकते. कोविडविरोधी लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यामुळे या व्हेरिएंटमुळे गंभीर आजार होण्याचा धोका कमी असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

जगभरात वाढणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सावधगिरी बाळगणे आवश्यक असले तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.



Protected Content

Play sound