जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रभू श्रीराम नवमी आणि भगवे हिंदू संमेलन शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६, आयोध्या नगर परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून शोभायात्रेचा मार्ग स्वच्छ व सुकर करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली.
शोभायात्रा मार्गावर सद्गुरु नगर दत्त मंदिरापासून सागर शॉपी, तृप्ती कॉर्नर ते श्रीराम मंदिरापर्यंतच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये गटारांची साफसफाई, रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढणे तसेच झाडू मारून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे शोभायात्रेसाठी मार्ग अधिक सुरक्षित आणि स्वच्छ करण्यात आला आहे.

या स्वच्छता मोहिमेसाठी भाजपा नगरसेवक डॉ. विरण सुरेश खडके आणि भाजपचे कोषाध्यक्ष विजय वानखेडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या समन्वयातून मनपा आरोग्य विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण केली. आगामी धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक प्रदीप रोटे, शिंदे सेनेचे हर्षल मावळे तसेच मनपा सेवानिवृत्त अधिकारी सोनगीरे यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी मिळून परिसर स्वच्छतेसाठी सहकार्य करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
रामनवमीच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने प्रशासनानेही आवश्यक तयारी सुरू केली आहे. स्वच्छता मोहिमेमुळे शोभायात्रेचा मार्ग सुकर आणि आकर्षक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



