जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी पुरुषाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने रेल्वे पोलिसांनी नागरिकांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशनवरील नवीन दादऱ्याच्या खाली एक अनोळखी पुरुष आजारी अवस्थेत आढळून आला. ऑन ड्युटी स्टेशन मास्टर अरुण सोपान नाफडे यांनी याबाबत तात्काळ रेल्वे पोलिसांना कळविले. त्यानंतर संबंधित व्यक्तीस उपचारासाठी सामान्य रुग्णालय, जळगाव येथे दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असताना सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, त्याचा बांधा सडपातळ आणि रंग सावळा आहे. अंगात आकाशी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असून, केस काळे-पांढरे वाढलेले आहेत. छातीवर ‘विजय’ असे गोंदलेले असून, उजव्या हातावर मारुतीचे चित्र तसेच बदाम व बाणासह इंग्रजी अक्षरे गोंदलेली असल्याची ओळख पटली आहे.
सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह ओळख पटविण्याच्या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी या वर्णनावरून संबंधित व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ रेल्वे पोलीस चौकी, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस चौकी जळगाव येथील पोलीस हवालदार सचिनकुमार भावसार करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.



