जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लाखो रुपयांची रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
घटनेनुसार, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10.55 वाजता अमळनेर येथील लामा जिनिंगचे मालक यतिन विनोद कोठारी (वय 48) हे त्यांच्या अॅक्टिवा दुचाकीवरून (MH-19-BC-1465) 5 लाख 27 हजार 200 रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असताना पिंपळे रोडवर तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्याकडील रोख रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान हा गुन्हा धुळे येथील मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ (वय 26) याने आपल्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले.
एलसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सुमारे दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेचा आणि फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.
अटक आरोपी मनोज मोकळ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याने जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची लूट केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. त्यावेळीही स्थानिक गुन्हे शाखेनेच त्याला अटक केली होती.
या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत असून, फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे , पोह. संदिप पाटील, पोह. हरिलाल पाटील, पोह. प्रविण मांडोळे, पोकॉ. राहुल कोळी, चापोहेकॉ दिपक चौधरी यांनी केली आहे. तसेच तांत्रिक विश्लेषण कामी पोकॉ गौरव पाटील व पोकॉ मिलींद सिताराम जाधव यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.



