जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडांचा व्यावसायिक वापर होत असतानाही मनपाला उत्पन्न मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली असून या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी नगररचना विभाग आणि अभियंत्यांना 23 मार्चपर्यंत सर्व भूखंडांची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेत सध्या मार्च एण्डच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आढाव्याची धावपळ सुरू असून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. काही संस्था, कंपन्या आणि शासकीय कार्यालयांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या दालनात नगररचना विभाग आणि अभियंत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीत उपायुक्त धनश्री शिंदे, नगररचना विभागाचे अमोल पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले आणि गौरव सपकाळे उपस्थित होते. बैठकीदरम्यान वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या घटकांची यादी तयार करून त्यांच्यावर वसुलीसाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरातील मोबाईल टॉवरकडून सुमारे 30 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचेही या बैठकीत उघड झाले. विशेष म्हणजे ही थकबाकी वसूल करण्यासाठी अद्याप शासनाशी आवश्यक पत्रव्यवहारही करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली. यामुळे उपमहापौरांनी प्रशासनाला तातडीने शासनाकडून मार्गदर्शन मागवून वसुलीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय, 2013 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेनुसार मनपाच्या मालकीची सुमारे 2200 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, या अहवालाला तब्बल 13 वर्षे लोटल्याने सध्याच्या बाजारमूल्याबाबत पुनर्मूल्यांकन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्व भूखंडांची अद्ययावत माहिती गोळा करून ती निश्चित मुदतीत सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर करून उत्पन्न वाढवण्यावर प्रशासनाने भर देण्याची आवश्यकता असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले. संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करत महसूल वाढीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.



