पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला सुरुवात होत असून नागरिकांनी आवश्यक माहिती वेळेत सादर करावी, अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भूषण अहिरे यांनी पुढे सांगितले की, (बीएलओ) यांच्या माध्यमातून गावागावांत मतदार यादीचे मॅपिंग सुरू आहे. सन २०२४ च्या मतदार यादीत नाव असलेल्या आणि सन २००२ च्या यादीतही नाव असलेल्या मतदारांची पडताळणी केली जात आहे. मात्र, ज्या मतदारांचे नाव २०२४ च्या यादीत आहे परंतु २००२ च्या यादीत नाही, अशा मतदारांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाशी संबंधित २००२ मधील मतदार यादीची माहिती शोधून संबंधित बीएलओकडे सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

जर संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव २००२ च्या यादीत उपलब्ध नसेल, तर आगामी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान बीएलओकडून दिला जाणारा अर्ज अचूकपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित मतदारांचे नाव अंतिम यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, २३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत बीएलओकडून घरभेटी दिल्या जाणार असून प्रत्येक मतदाराने आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत सहकार्य न केल्यास पुढील प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी संबंधित मतदारच जबाबदार राहतील, असेही भूषण अहिरे यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला निवडणूक नायब तहसीलदार रणजीत पाटील, लिपिक उमेश वाडेकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



