भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी चारुलता कैलास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत कैलास श्यामराव महाजन यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही निवड वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बाजार समितीचे सभापती अनिल वारके, उपसभापती तसेच संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने चारुलता महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित करण्यात आली. या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजात सातत्य राखले जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

चारुलता महाजन यांच्या निवडीवेळी अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. वसंतराव उखंडे, नगरसेवक संतोष चौधरी (दाढी), ॲड. बोधराज चौधरी, गुड्डू अग्रवाल, निखिल पाटील, शंकर चौधरी, शिवाजी पाटील तसेच माळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय किरण महाजन, सतीश महाजन, आर. एस. माळी आणि शैलेश महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या निवडीच्या प्रसंगी हजेरी लावली.
चारुलता महाजन यांच्या बिनविरोध निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दिवंगत कैलास महाजन यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत बाजार समितीच्या विकासासाठी त्या प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या विविध योजनांना गती मिळेल आणि स्थानिक कृषी बाजार व्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



