Home क्राईम धावत्या ट्रकला लागली भीषण आग; अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात !

धावत्या ट्रकला लागली भीषण आग; अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर ते भुसावळ महामार्गावर शुक्रवारी १३ मार्च रोजी दुपारी एका धावत्या आयशर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. कुऱ्हे पानाचे गावाजवळील देवेंद्र हॉटेलसमोर हा प्रकार घडला. ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, केमीकलने भरलेला ड्रम, सल्फ्युरिक ॲसिडसारखा ज्वालाग्राही साठा आणि विद्यूत पंप असल्याने परिसरात मोठी घबराट पसरली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकसह त्यातील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरकडून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेला ट्रक क्रमांक () हा जात होता. शुक्रवारी १३ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास कुऱ्हे पानाचे गावाजवळ असलेल्या देवेंद्र हॉटेलच्या परिसरात हा ट्रक आला असता, अचानक केबिनच्या खालून धूर निघण्यास सुरुवात झाली. चालकाच्या हे लक्षात येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. काही वेळातच ट्रकने मोठा पेट घेतला.

सिलिंडर आणि ॲसिडमुळे धोका वाढला :
सदर ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर आणि सल्फ्युरिक ॲसिड भरलेले होते. आगीमुळे सिलिंडरचा स्फोट होण्याची भीती निर्माण झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगरपालिकेचे आणि परिसरातील कंपन्यांचे असे सुमारे ५ ते ६ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वाहतुकीचा खोळंबा अन् पोलिसांची मदत :
या भीषण आगीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही स्थानिक तरुणांच्या मदतीने पोलिसांनी अडकलेली वाहतूक संथ गतीने पूर्ववत केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


Protected Content

Play sound