यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील रहिवासी आणि सध्या मुंबई येथे राज्य समन्वयक म्हणून कार्यरत असलेले हसन जहाँगीर तडवी यांची राष्ट्रीय स्तरावरील जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जल महोत्सवासाठी निवड झाली असून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला. या गौरवामुळे यावल तालुक्यासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जल जीवन मिशन आणि राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हसन तडवी यांची या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून जल जीवन मिशन अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यासाठी देशभरातून निवडक प्रतिनिधींना या जल महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील प्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी मिळाली. जल जीवन मिशन अंतर्गत १०० टक्के पाणीपट्टी वसुली, प्रभावी जलव्यवस्थापन तसेच स्वच्छता उपक्रम राबविण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. या पार्श्वभूमीवर हसन तडवी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.
हसन तडवी हे आदिवासी कुटुंबातून पुढे आलेले असून त्यांनी ग्रामीण भागात पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या या कामगिरीमुळे जल जीवन मिशनच्या उद्दिष्टांना गती मिळाल्याचे मानले जात आहे.
हसन तडवी यांच्या निवडीमुळे यावल तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक नागरिक तसेच आदिवासी समाज बांधवांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे.



