जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजातील विवाहेच्छुक उपवर-वधूंसाठी यंदाही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने ११ मे २०२६ रोजी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालयात मोफत सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मानले जात आहे.
या उपक्रमाबाबत नुकतीच प्रतिष्ठानची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे होते, तर मार्गदर्शक म्हणून कोळी मंडळ चोपडा संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर उपस्थित होते. मागील तीन वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी मे महिन्यात सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात आयोजित केला जात आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत पन्नासहून अधिक उपवर-वधूंचे विवाह प्रतिष्ठानतर्फे मोफत लावण्यात आले आहेत. समाजातील विविध दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने हा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडत असतो. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चार ते सहा महिन्यांपासून नियोजन आणि तयारी करत असतात.
सामूहिक विवाह सोहळ्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यामुळे हा सोहळा केवळ विवाहापुरता मर्यादित न राहता समाजातील एकात्मतेचा आणि सहकार्याचा उत्सव ठरतो.
विवाह नोंदणीसाठी इच्छुक वधू-वरांनी लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो तसेच दोन्ही कुटुंबांचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. विवाह सोहळ्यात वधू-वरांना लग्नासाठी आवश्यक ड्रेस, बूट-चप्पल तसेच संसारोपयोगी वस्तू भेट स्वरूपात दिल्या जाणार आहेत. याशिवाय वधू-वरांची एकत्रित वरात काढून भव्य शोभायात्रा मिरवणूकही आयोजित करण्यात येणार आहे.
लग्न सोहळा शुभमुहूर्तावर पार पडणार असून कार्यक्रमासाठी भव्य स्टेज, गेट, मंडप, व्यासपीठ, वाजंत्री, भोजन व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी विवाह नोंदणी ३० एप्रिल २०२६ पर्यंत संस्थेच्या श्री शनि मंदिरासमोरील कार्यालयात करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी कोळी, उपाध्यक्ष संजय बाविस्कर, सचिव अनिल कोळी, ज्येष्ठ सल्लागार गोकुळ सूर्यवंशी, संघटक आनंद सपकाळे, सहसचिव अक्षय सोनवणे, खजिनदार सुधाकर बाविस्कर, सहखजिनदार दीपक कोळी, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, गणेश बाविस्कर यांच्यासह भिकन नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, रतन बिऱ्हाडे, सतीश कोळी फौजी, नरेंद्र सपकाळे आणि निश्चलदास साळुंखे हे विशेष प्रयत्न करत आहेत.



