
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगर परिषदेत आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमावरून राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमातून डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाराज झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नगर परिषद प्रशासनाची भेट घेत कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

नगर परिषदेतर्फे काल जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात विरोधी पक्षाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या यांना निमंत्रण किंवा सन्मान न दिल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या गटाने नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. महिला दिनासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय महिला प्रतिनिधींना समान सन्मान मिळणे अपेक्षित असताना काही पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
या वेळी सहाय्यक मुख्याधिकारी रविकांत डांगे, शेळके, बचत गट निरीक्षक गजानन महाजन, नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता संग्राम शेळके आणि कार्यालय प्रमुख विशाल काळे हे अधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी या अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, अशी मागणी केली.
या बैठकीला नगर परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमिना बी शाकिर शेख, भाजपच्या गटनेत्या नंदा महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस (अ) गटाच्या गटनेत्या वर्षा चोपडे, नगरसेवक राकेश कोलते, नगरसेवक उमेश फेगडे तसेच बांधकाम समितीच्या सभापती अंजुम बी कदीर खान यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना समान वागणूक द्यावी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात होऊ नये, अशी मागणी केली. महिला दिनासारख्या कार्यक्रमात महिला लोकप्रतिनिधींना योग्य सन्मान मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.



