Home Cities जळगाव विकासकामे रखडली; नागरिकांचा आमदार सुरेश भोळेंना ‘अंत्ययात्रा आंदोलन’चा अल्टिमेटम

विकासकामे रखडली; नागरिकांचा आमदार सुरेश भोळेंना ‘अंत्ययात्रा आंदोलन’चा अल्टिमेटम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विविध मूलभूत समस्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरातील त्रस्त नागरिकांनी आमदार सुरेश दामु भोळे यांना निवेदन देत निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली असून, 23 मार्च 2026 पर्यंत समस्यांचे निराकरण न झाल्यास अनोख्या पद्धतीने ‘अंत्ययात्रा आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात आमदार सुरेश दामु भोळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रामेश्वर कॉलनी परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही या समस्यांवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार एमआयडीसी भुखंड क्रमांक डी-४५/२ येथून कामगारांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कामगारांना ये-जा करण्यासाठी योग्य मार्ग नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच मेहरूण स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रश्नही दीर्घकाळ प्रलंबित असून परिसर स्वच्छ व व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

गट क्रमांक २५० मधील हनुमान मंदिराजवळील ओपन स्पेसचे सुशोभीकरण करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे. हा परिसर सार्वजनिक वापरासाठी विकसित करून नागरिकांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा राखीव करून देऊन शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.

तसेच गट क्रमांक २४९ मधील एमडीएस कॉलनीत शिवदत्त मंदिराजवळील मोकळ्या जागेला संरक्षण भिंत बांधण्याची मागणीही करण्यात आली आहे. ही जागा सुरक्षित करण्यासाठी संरक्षण भिंत उभारल्यास परिसरातील नागरिकांना सुरक्षितता मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या सर्व समस्या आणि विकासकामांबाबत आमदारांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत नागरिकांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

या निवेदनावर ज्ञानेवर आर. पाटील, संदीप प्रकाश मांडोळे, विशाल गोपाळ पाटील, महेश वासुदेव माळी, सचिन वाघ, भाऊसाहेब पाटील, उमेश निबाजी खांबेटे, एस. आर. जगताप, संजय साडू सपकाळे, हर्षल वाणी, उमेश खांबेटे, नंदू पुरोहित आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 23 मार्च 2026 पर्यंत समस्यांवर ठोस निर्णय न झाल्यास ते जिवंतपणे तिरडीवर झोपून ‘अंत्ययात्रा आंदोलन’ काढतील.

 


Protected Content

Play sound