
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समिती कार्यालयाकडून जनहितार्थ शासकीय योजनांची माहिती देण्यास सातत्याने टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सहा महिन्यांपासून वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे तसेच यावल पंचायत समितीकडे विस्तृत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात पंचायत समिती प्रशासन जनहिताच्या योजनांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत असून राज्य शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र या निवेदनाला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
तक्रारदारांच्या मते, गेल्या सहा महिन्यांपासून पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून कोणतीही स्पष्ट व सकारात्मक माहिती देण्यास नकार दिला जात असून “तुमच्याकडून जे होईल ते करा, आम्ही नियमानुसार कारवाई करू” असे टाळाटाळ करणारे उत्तर दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यावल पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित कामांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र कार्यालयातील कामकाजाच्या पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. संबंधित विभागांतील शिक्षण अधिकारी, कृषी अधिकारी तसेच अभियंते देखील नागरिकांना अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने पंचायत समिती कार्यालय हे जणू एखाद्या खाजगी कंपनीप्रमाणे चालत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाने गटविकास अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा निवेदन देत सात दिवसांच्या आत शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा जीवाची पर्वा न करता उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही हा मुद्दा मांडण्यात आला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या निवेदनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, तालुका अध्यक्ष आकाश चोपडे, शहराध्यक्ष योगेश पाटील, प्रेम देवरे, गोलू महाजन, योगेश कोळी, जुनेद खान, अल्तमश शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



