जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘मराठी राजभाषा गौरव दिना’चे औचित्य साधत जळगाव महानगरपालिका संचालित मराठी मुलांची शाळा क्रमांक ३२ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्वसमावेशक आणि उत्साहपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या शाळेत ९५ टक्के विद्यार्थी मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी मराठी भाषेप्रती दाखवलेले प्रेम आणि अभिमान यामुळे हा कार्यक्रम शहरभर चर्चेचा विषय ठरला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी भाषा प्रसार आणि अभिमान जागवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीत’ सादर करून झाली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांच्या हस्ते पारंपरिक फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. फेट्यांच्या मंगलमय वातावरणामुळे संपूर्ण शालेय परिसरात अभिमान आणि उत्साहाची भावना निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून त्यांच्या आनंदात अधिक भर टाकण्यात आली.

या उपक्रमाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी मुस्लिम समाजातील असून त्यांची मातृभाषा हिंदी असतानाही ते अत्यंत आवडीने आणि जिद्दीने मराठीचे शिक्षण घेत आहेत. “मराठी ही केवळ राजभाषा नसून संवाद, संस्कृती आणि समन्वयाची भाषा आहे,” हे या विद्यार्थ्यांनी आपल्या सहभागातून अधोरेखित केले. विविधतेतून एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे ध्येय असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी यावेळी सांगितले. विशेषतः अमराठी भाषिक विद्यार्थी मराठी शिकत असतील तर त्यांचे कौतुक आणि प्रोत्साहन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मनसेतर्फे जळगाव महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व मराठी शाळांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी घोषणा करण्यात आली. शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘मनुष्यबळ आणि लक्ष’ केंद्रित केले जाईल, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक संदीप बांगर यांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकवर्गातील श्रीकृष्ण बाविस्कर, मीनाक्षी बदर, तुषार चौधरी आणि संदीप रोकडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाला मनसेचे महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष आशुतोष जाधव, खुशाल ठाकूर, दीपक राठोड, विकास पाथरे, ऋषिकेश मेंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्रीकृष्ण मेंगडे यांनी आभार मानले.



