जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा भागातील प्रभाग क्रमांक १० मधील भाजपचे विजयी उमेदवार जाकीर खान यांनी बनावट जन्मदाखला सादर करून महापालिका आणि शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
कुलभूषण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० ‘ड’ मधून जाकीर खान यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या अपत्यांची संख्या केवळ तीन असल्याचे नमूद केले होते. मात्र, कुलभूषण पाटील यांनी महापालिकेकडून जाकीर खान यांच्या हयात असलेल्या सर्व अपत्यांचे जन्मदाखले मिळवले असता, धक्कादायक माहिती उघड झाली.
महापालिकेच्या नोंदीनुसार दोन अपत्यांच्या जन्मामध्ये केवळ १५ दिवसांचे अंतर असल्याचे दिसून येत आहे. १५ दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळे जन्मदाखले मिळवून त्यांनी निवडणूक आयोगाची आणि शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

निवडणूक लढवण्यासाठी आणि इतर शासकीय लाभ मिळवण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जाकीर खान रसुल खान यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुलभूषण पाटील यांनी केली आहे. या तक्रारीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



