बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिन आणि शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून न्याय, समता आणि स्वराज्याचा संदेश देत सामाजिक न्यायाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. न्यायालयीन अधिकारी, वकील, कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने न्यायव्यवस्थेच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. खोलम उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेचा गौरव करताना सांगितले की, शिवरायांचे स्वराज्य हे सामाजिक न्यायाचे खरे प्रतीक होते. जात, धर्म, लिंग किंवा वंश यापलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना समान न्याय देणारी ती व्यवस्था होती.

ॲड. अर्जुन पाटील यांनी पुढे सांगितले की, आजच्या समाजात अनेक ठिकाणी वैचारिक मतभेद आणि सामाजिक दरी निर्माण झाली आहे. जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक आणि राजकीय प्रगतीला खरा अर्थ प्राप्त होत नाही. पीडित, शोषित आणि उपेक्षित घटकांना वेळेत न्याय मिळवून देणे हीच सामाजिक न्यायाची खरी कसोटी असून न्यायव्यवस्थेसमोर सर्वजण समान आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक सामाजिक न्याय दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगण्यात आले की, संयुक्त राष्ट्र संघटना यांनी २० फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला आहे. यावर्षीची संकल्पना “सामाजिक अन्यायातील दरी सांधणे आणि संधी निर्माण करणे” ही असून गरिबी, बेरोजगारी आणि मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर भारत आणि राज्य शासनही विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत न्याय पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. धनराज प्रजापती आणि ॲड. के. एस. इंगळे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ॲड. किशोर महाजन यांनी केले. या कार्यक्रमाला ॲड. अमोल पाटील, ॲड. समीर पिंजारी, ॲड. सी. के. पाटील यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. न्यायालयीन प्रशासनाच्या वतीने अधीक्षक वैभव तरटे, प्रशांत कुमार बेदरकर, श्रीराम भट, योगेश वाणी, एस. के. बेलदार, अविनाश राठोड तसेच न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.



