Home Cities भुसावळ काहुरखेडे शाळेचे २८ विद्यार्थी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चमकले; शिवजयंती निमित्त गौरव

काहुरखेडे शाळेचे २८ विद्यार्थी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चमकले; शिवजयंती निमित्त गौरव


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील काहुरखेडे येथील जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि उल्लेखनीय सहभाग नोंदवत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. अवघ्या ६४ पटसंख्येच्या शाळेतून तब्बल २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या वक्तृत्व कौशल्याचा ठसा उमटविला.

अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने आयोजित या जिल्हास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी भाषण सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे एवढ्या कमी पटसंख्येच्या शाळेतून निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यामुळे परीक्षक, आयोजक, पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या यशामागे शिक्षक समाधान जाधव, मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे आणि उपशिक्षिका ममता तडवी यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले असून त्यांच्या प्रयत्नांचेही सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शाळेतही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर करून उपस्थितांना प्रेरित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होण्याबरोबरच त्यांचे वक्तृत्व कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमास सरपंच गीता पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि शाळा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी केवळ जिल्हास्तरीय स्पर्धेतच नव्हे, तर भुसावळ येथे आयोजित कार्यक्रमात तसेच सायंकाळी गावात झालेल्या शिवजयंती व्याख्यानमालेतही प्रभावी भाषणे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट तयारीमुळे ग्रामस्थांनी मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, शिक्षक समाधान जाधव आणि उपशिक्षिका ममता तडवी यांचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 


Protected Content

Play sound