रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.
रावेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसांपूर्वी लुटमार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

या विशेष पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत मोहम्मद उबेद मोहम्मद एजाज(रा.नागझिरी चौक रावेर), शेख मोईन शेख नईम आणि रहेमान खान जावेद खान (दोघे रा. विवरे बुद्रुक ता. रावेर)या तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. आरोपींकडून १५ हजार रुपये रोख रक्कम तसेच ३५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच-०२-सीएन-५३७६) जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गजानन वाघ, पोलीस कर्मचारी पंकज शिरसाठ, सुनील सूर्यवंशी, समधुर पाटील, विशाल पाटील, समीर बिजनारे, शिरीष चव्हाण आणि गजानन वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. कल्पेश मुरलीधर आमोदकर, सुकेश शब्बीर तडवी, प्रमोद सुभाष पाटील, विशाल शिवाजी पाटील, विकार गयासोद्दीन शेख, संभाजी बिजागरे, श्रीकांत चव्हाण, गजानन बोने यांच्या पथकाने ही कारवाई केली
दरम्यान, या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याच परिसरात घडलेल्या आठ लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा तपासही पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.



