यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याला अभिवादन करण्यात आले.
कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सरपंच विलास अडकमोल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. कार्यक्रमात शिवरायांच्या कार्याचा आणि त्यांच्या आदर्शांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सरपंच विलास अडकमोल यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व समाजघटकांना एकत्र कसे आणले आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कसे कार्य केले, याबद्दल सविस्तर माहिती दिली. शिवरायांचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास उपसरपंचांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य अमोल नेहेते, दीपक नेहेते, शिवसेना शाखाध्यक्ष भरत चौधरी, सतीश चौधरी, योगेश पाटील, नागो तायडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.



