जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वाढता वापर, त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय आणि आरोग्याचे धोके लक्षात घेता महापौर सौ. दिपमाला काळे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून प्लास्टिक विक्रेते आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सिंगल यूज प्लास्टिकवर प्रभावी बंदी कशी लागू करावी, याबाबत चर्चा होणार आहे.
जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात महापौर दिपमाला काळे यांनी नमूद केले आहे की, एकेरी वापराचे प्लास्टिक मोकाट जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच हे प्लास्टिक गटार आणि नाल्यांमध्ये साचल्यामुळे पाण्याचा निचरा अडतो आणि त्यामुळे पावसाळ्यात रहिवासी भागांमध्ये पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात.

प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते जमिनीत साचून राहते आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. यामुळे पर्यावरणाला दीर्घकालीन नुकसान होत असल्याचेही महापौरांनी नमूद केले आहे. या गंभीर परिणामांच्या पार्श्वभूमीवर शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू केली असली तरी शहरात अद्याप त्याचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता प्लास्टिक विक्रेते असोसिएशन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील १७ व्या मजल्यावरील महापौर दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस प्लास्टिक विक्रेते असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देश सहायक आयुक्त (आरोग्य) यांना देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका प्रशासनाने अद्ययावत माहिती आणि आवश्यक अहवालासह बैठकीस उपस्थित राहावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील पर्यावरण संरक्षण, नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता यासाठी सिंगल यूज प्लास्टिकवर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले असून या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगाव शहरात प्लास्टिकविरोधी मोहिमेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि प्लास्टिक विक्रेते यांच्यातील ही बैठक निर्णायक ठरणार असून सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कठोर कारवाईची दिशा या बैठकीतून निश्चित होण्याची शक्यता आहे.



