जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत असून ब्रह्माकुमारीज्तर्फे प्रथमच भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंग यांच्या स्मरणार्थ भव्य शिवलिंगाची प्रेरणादायी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या दिव्य दर्शन सोहळ्यामुळे जळगावकरांना आध्यात्मिक अनुभूतीची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.
रायसोनी स्कूलसमोरील बेंडाळे ग्राऊंड, पिंप्राळा रोड येथे सुमारे वीस हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण परिसरात ही भव्य ज्योतिर्लिंग प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवेश करताच भाविकांना शिवभक्तीचे आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत असून संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. जागृत शिवलिंगाची ही प्रतिकृती केवळ दर्शनापुरती मर्यादित नसून, भक्तांच्या आत्मिक उन्नतीसाठी विविध आध्यात्मिक उपक्रमांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

या दर्शन स्थळी मेडिटेशन कक्ष, प्रवचन कक्ष आणि भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी संपूर्ण ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळत आहे. शिवतत्त्व, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचा खरा अर्थ समजावा या उद्देशाने शिवध्वज संकल्पनेवर आधारित विशेष प्रदर्शनी कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये चित्रे, प्रेरणादायी संदेश आणि आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून परमात्मा शिव यांचा सत्य परिचय करून दिला जात आहे.
या उपक्रमासाठी ब्रह्माकुमारीजच्या जळगाव सबझोन इन्चार्ज राजयोगिनी यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. जळगावकर जनतेच्या आध्यात्मिक सेवेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून भाविकांमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत हे दर्शन २० फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.



