वरणगाव ता. भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील दिव्यांग व सर्वसामान्य घटकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा या उद्देशाने वरणगाव येथे एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ई-श्रम कार्ड आणि आयुष्मान भारत आरोग्य कार्ड मोफत काढून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
एन.एम.पी. पुणे, टाटा ए.आय.जी. आणि स्वस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात दिव्यांगांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ थेट मिळाल्याने अनेक गरजू लाभार्थ्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, एका ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण होत असल्याने नागरिकांची गैरसोय टळली.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३०० ते ४०० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ई-श्रम व आयुष्मान भारत कार्डचा लाभ घेतला. आरोग्य सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आयुष्मान कार्डामुळे लाभार्थ्यांना भविष्यात मोठा आधार मिळणार आहे, तर असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड आर्थिक व सामाजिक सुरक्षेचे साधन ठरणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग सहाय्यक साहित्य वाटपाचाही कार्यक्रम नियोजित होता. मात्र, मुंबई येथील मान्यवर काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू न शकल्याने हे साहित्य वाटप पुढील तारखेला करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. लवकरच स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करून दिव्यांगांना आवश्यक साहित्य वितरित केले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्था वरणगाव शहराचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली रफीक शेख सांडु, विजय चौधरी, सुखराम माळी, रेहमान शाह, सुनील पाटील, संतोष पाटील, रामा शिवरामे, बाळू सैतवाल, आर्यन परदेशी, संतोष देशमुख, अनिल इंगळे, आनंदा झांबरे, अविनाश पाटील, नमन माळी, दर्शन माळी, विद्याताई सोनार, सुजाता ताई भोई, योगिता खडसे, साधना ताई जांभुरे आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



