जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती २०२६ निमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. सृष्टीचे निर्माते मानल्या जाणाऱ्या परमपिता प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांत समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
भव्य पालखी सोहळा आणि पूजन
शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ओंकारेश्वर मंदिर येथून प्रभू विश्वकर्मांच्या पालखीचे जल्लोषात प्रस्थान झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जयघोष आणि भक्तिगीतांच्या स्वरांत निघालेली ही पालखी हातनूर वसाहत हॉल, महाबळ येथे पोहोचली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना विश्वकर्मा समाजाच्या ऐक्याचे आणि योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक व मान्यवरांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मांची महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, पारोळा येथील नगरसेविका कविता रमेश खैरनार, मनोजालय फाउंडेशनचे (बहादरपूर) विजय शांताराम सुतार यांची उपस्थिती होती.
यावेळी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला, तसेच समाज प्रबोधन आणि शैक्षणिक प्रगतीवर मान्यवरांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
यांची लाभली उपस्थिती
सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते:
गाडी लोहार समाज संघटना पदाधिकारी भूषण सांगोळे, संस्थापक अध्यक्ष हर्षल सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत तायडे, सचिव शरद बोरसे, यशवंत कापडे, निलेश देवरे, रावसाहेब बोरसे, प्रमोद रुल्हे, प्रवीण सोनवणे, मनोज बाविस्कर, राकेश मोरे, मिलिंद निकम, विक्की अहिरे, चेतन रुल्हे, सुहास वरले. महिला अध्यक्ष नीता सांगोळे, महिला संघटक बेबा सूर्यवंशी आदी उपथितीत होते.



