जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३० जानेवारी रोजी जळगाव शहरात दोन मिनिटे मौन पाळून कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार जळगाव महानगरपालिकेने सकाळी ठीक ११ वाजता आयोजित केलेल्या या उपक्रमाला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही क्षणांसाठी शहरातील दैनंदिन हालचाली थांबल्या आणि परिसरात गंभीर शांततेचे वातावरण निर्माण झाले.

हुतात्मा दिनाचे गांभीर्य जपण्यासाठी महानगर प्रशासनातर्फे पूर्वतयारी करण्यात आली होती. सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी महानगरपालिकेचा पहिला इशारा भोंगा वाजवण्यात आला. भोंगा वाजताच मुख्य प्रशासकीय इमारतीसह शहरातील विविध शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेले कामकाज जिथल्या तिथे थांबले.

यानंतर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि त्या वेळी उपस्थित नागरिकांनी आपापल्या जागी स्तब्ध उभे राहून दोन मिनिटे मौन पाळले. केवळ कार्यालयीन कर्मचारीच नव्हे, तर रस्त्यावरून जाणारे पादचारी आणि वाहनचालकांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत दोन मिनिटे थांबून राष्ट्रप्रेम व्यक्त केले. या दोन मिनिटांत शहरातील वातावरण अत्यंत शांत आणि भावपूर्ण झाले होते.
मौन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी दुसरा इशारा भोंगा देण्यात आला. त्यानंतर थांबलेले कार्यालयीन कामकाज आणि शहरातील हालचाली पूर्ववत सुरू झाल्या. उपक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि नागरिकांचा सहभाग यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला.
या प्रसंगी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी सांगितले की, हुतात्म्यांचे बलिदान हे देशाच्या इतिहासातील सर्वोच्च त्याग आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि तरुण पिढीत देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. शासनाच्या निर्देशानुसार जळगाव मनपाच्या सर्व अधिकारी-कर्मचारी आणि शहरवासीयांनी एकत्रितपणे मौन पाळून वीरांना आदरांजली अर्पण केली, असे त्यांनी नमूद केले.
हुतात्मा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून जळगाव शहराने स्वातंत्र्यसैनिकांप्रती असलेली कृतज्ञता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना पुन्हा अधोरेखित केली.



