Home Cities जळगाव महापौर–उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू; एकही अर्ज दाखल नाही

महापौर–उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू; एकही अर्ज दाखल नाही


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी प्रशासकीय प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली असून बुधवारी नामनिर्देशनपत्र देण्याच्या पहिल्या दिवशी आणि आज गुरुवारी (२९ जानेवारी)  एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र घेण्याची अंतिम मुदत ३० जानेवारी असल्याने अद्याप दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारीबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात असले तरी अंतिम क्षणापर्यंत प्रतीक्षा करण्याची रणनीती पक्षांकडून अवलंबली जात असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

महानगरपालिकेतील सत्तासमीकरण, आरक्षणाची स्थिती या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. विविध पक्षांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असून, स्थानिक पातळीवर तसेच वरिष्ठ पातळीवर चर्चांचा फड रंगत असल्याचे चित्र आहे. संयुक्त बैठका अद्याप पार पडलेल्या नसल्याने उमेदवारीची अधिकृत नावे जाहीर होण्यास विलंब होत आहे.

महापौर आणि उपमहापौर ही पदे केवळ औपचारिक नसून विकासकामांना गती देणे, प्रशासनाशी समन्वय राखणे आणि शहराच्या धोरणात्मक निर्णयांत भूमिका बजावणे या दृष्टीने ती महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या दिवशी अचानक अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

 


Protected Content

Play sound